Monday, June 29, 2009

होय, दादाजी कोंडदेव हे शिवाजी महाराज यांचे राजकीय गुरु होते

स्वत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रांमधील उल्लेख, इतर समकालीन व उत्तरकालीन कागदपत्रे आणि बखरी या सर्व प्रकारच्या साधनांमधून दादाजी कोंडदेव यांच्या कामगिरीचे एक सुसंगत चित्र आपल्यापुढे उभे राहते. सुमारे शंभर वर्षांपूर्वीचे इतिहासकार
श्री. कृष्णराव केळूसकर यांच्यापासून ते सध्याचे नामवंत इतिहासकार प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांच्यापर्यंत अनेक विद्वान इतिहासकारांनी दादाजी कोंडदेव यांच्या कार्याचे वर्णनही केले आहे.
पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरल्याची नोंद ज्या एकमेव सहा कलमी शकावलीत आहे, त्या नोंदीतदेखील दादाजी यांचा स्पष्ट उल्लेख आहे. असे असतांना सत्तेच्या राजकारणाने अंध झालेले काँग्रेस शासन मूठभर मराठी संघटनांच्या दबावाला बळी पडून इतिहासातून दादाजी कोंडदेव यांचे नाव पुसण्याचा प्रयत्‍न करत आहे. याची सुरुवात दादोजी कोंडदेव क्रीडा पुरस्काराचे नाव बदलून झाली. तेवढ्याने समाधान न झालेल्या या ब्राह्मणद्वेष्ट्या मंडळींनी शिवस्मारक समितीत शासनाने निवडलेले शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाला विरोध केला. या वर्षी नव्याने प्रकाशित झालेल्या इयत्ता ४ थीच्या इतिहासाच्या पुस्तकातून शासनाने दादाजी कोंडदेव यांनी शिवरायांना शिक्षण दिल्याचा उल्लेख वगळून खरा इतिहास विद्यार्थ्यांपासून लपवण्याचे पाप केले. शहाजीराजे यांच्या अतिशय विश्‍वासू लोकांमध्ये दादाजी कोंडदेव यांचा उल्लेख इतिहासात आढळतो. लेखामध्ये दादाजी कोंडदेव यांच्या व्यक्‍तीत्वातील विविध पैलंूबद्दल या लेखात माहिती देत आहोत. दादाजी कोंडदेव हे शिवाजी महाराज यांचे राजकीय गुरु होते, याबद्दल पुरावे सांगणारी माहिती उद्याच्या अंकात प्रसिद्ध होणार्‍या उत्तरार्धात वाचा. (

शाहजी महाराजांकडून पुणे परगण्याच्या देखरेखीसाठी दादाजी कोंडदेव यांची नियुक्‍ती
आदिलशाहीने वैराण केलेल्या पुणे परगण्याची पुन्हा भरभराट करण्याकरता शाहजी महाराजांनी दादाजी कोंडदेव यांची नेमणूक केलेली होती. पुणे परगणा व त्याच्या आसपासचा जो मुलूख शाहजी महाराजांकडे जहागीर म्हणून होता, त्याचा कारभार शाहजी महाराजांच्या नोकरीतील सुभेदार या नात्याने दादाजी कोंडदेव पाहात असे. दादाजी कोंडदेव यांचा जुन्यातला जुना उल्लेख इ.स. १६३३ मधील एका पत्रात आला आहे. पुणे परगण्यातील महमदवाडी या गावासंबंधी हे पत्र आहे. त्यात त्या गावचा पाटील जाऊ पाटील याने लिहून दिले आहे की :
`बापूजी देऊ पाटील घुले हा आपला भाऊ दुष्काळ पडला म्हणून गाव सोडून परमुलुखाला गेला. त्यावर वडील तो मेले. आम्ही वाचलो. सुकाळ झाला. यावर दादाजी कोंडदेव सुभेदार दिवाण झाले. त्यांनी मुलूख लावला. देशमुख, देशकुलकर्णी यांना ताकीद केली की, ``हा गाव पडला, पाटील आणऊन गाव लावणे.'' मग आपणास नेऊन कौल (म्हणजे अभय, आश्‍वासन) देऊन गाव लावला. (संदर्भ : शिवचरित्रसाहित्य, खंड २, लेखांक ९५.) याच प्रकरणी, याच तारखेचा व याच आशयाचा, एक कागद गोताच्या साक्षीने करण्यात आला. त्यातही ``राजश्री दादाजी कोंडदेव सुभेदार येऊन गावाची गाव लाविला'' (म्हणजे ओसाड पडलेली गावे परत वस्ती करवून भरभराटीस आणली) असा उल्लेख आहे. (संदर्भ : शिवचरित्रसाहित्य, खंड २, लेखांक ९६.)

इतिहासातील दाखल्यांकडे दुर्लक्ष करून दादाजी कोंडदेव व जिजाऊबाई यांच्या संबंधांवर अश्लील लिखाण करणारे जेम्स लेन !
शाहजी महाराज आणि मातुश्री जिजाबाई यांच्याविषयी दादाजी कोंडदेव यांची काय भावना होती ? छत्रपती शाहू महाराजांनी शिरवळ परगण्याच्या देशकुलकर्णीविषयीच्या एका तंट्याचा निवाडा करून त्या परगण्याचा देशपांडे म्हणजेच देशकुलकर्णी, यादो गंगाधर, याला दिलेले १ ऑक्टोबर १७२८ या तारखेचे एक अस्सल वतनपत्र उपलब्ध आहे. (संदर्भ : ३. शिवचरित्रसाहित्य, खंड १, लेखांक ८२ (पृ. ९३ ते ९७) पुरावा म्हणून जी कागदपत्रे शाहू महाराज यांच्यासमोर त्या प्रकरणी दाखल करण्यात आली, त्यात दादाजी कोंडदेव यांनी शिरवळ परगण्याच्या हवालदाराला पाठविलेले २ एप्रिल १६४६ या तारखेचे एक अस्सल पत्र होते. ते पत्र छत्रपती शाहू महाराजांनी ग्राह्य मानले आहे आणि वर नमूद केलेल्या त्यांच्या वचनपत्रात उद्धृतही केले आहे. दादाजी कोंडदेव यांच्या त्या पत्रात जिजाबाई साहेबांचा उल्लेख `सौभाग्यवती मातुश्री जिजाआऊ साहेब' असा आला आहे. (४. शिवचरित्रसाहित्य, खंड १, लेखांक ८२ (पृ. ९६) राजमाता जिजाबाई, छत्रपती शिवाजी महाराज आणि दादाजी कोंडदेव यांच्याविषयी खोटा, गलिच्छ व हलकट मजकूर लिहिणारा जेम्स लेन आणि त्या हलकट मजकुराचा प्रचार व प्रसार करणारी मंडळी यांना दादाजी यांच्या पत्रातला हा `मातुश्री जिजाआऊ साहेबांचा' उल्लेख हे चोख उत्तर नाही का ?

दादाजी कोंडदेव यांच्या विविध कामगिरींबद्दल ऐतिहासिक पुरावे !
शाहजी महराजांच्या नोकरीत सुभेदार म्हणून काम करत असतांना दादाजी यांना वतनासंबंधीच्या निरनिराळया तंट्यांचे निवाडे करावे लागले. गोतसभेत दादाजी यांच्या उपस्थितीत झालेल्या अशा निदान नऊ निवाड्यांची कागदपत्रे उपलब्ध आहेत. (मराठ्यांच्या इतिहासाची साधने) दादाजी कोंडदेव यांनी उजाड झालेला मुलूख पुन्हा लागवडीखाली आणला, अशा आशयाचा उल्लेख अनेक कागदपत्रांमध्ये व बखरींमध्ये आलेला आहे. (उदा. शिवचरित्रसाहित्य, खंड २, मराठ्याच्या इतिहासांची साधने, ऐतिहासिक संकिर्ण-साहित्य, इत्यादी) पुणे परगण्यातील बाणेर (सध्याचे बाणेर) या गावी दादाजी कोंडदेव यांनी पिण्याच्या पाण्याकरता पाट बांधून आणल्याचा उल्लेख एका पत्रात आला आहे. (पेशवे दप्‍तरातून निवडलेले कागद, खंड ११, लेखांक ६५). पुण्यातून वाहणार्‍या आंबील ओढ्याला दादाजी कोंडदेवाने धरण बांधल्याचा उल्लेखही एका जुन्या कागदात आहे. (पुणे नगर संशोधन वृत्त, खंड १, टाचण क्र. ४८).